काबूल, बीजिंग, इस्लामाबाद – युरोपात उष्णेतेची लाट सुरू असताना अफगाणिस्तान, चीन आणि पाकिस्तान या आशिया खंडांमधील देशांमध्ये अतिवृष्टीमुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. या तिन्ही देशांमध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले असून भूस्खलनाच्या अनेक घटनाही घडल्या आहेत.
गेल्या 1-2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मालमत्ता आणि जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे वृत्त आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये यापूर्वी प्रलयंकारी पूर येऊन गेला आहे. मात्र आता अफगाणिस्तानमध्येही तशाच पुराची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
अफगाणिस्तानमध्ये 600 घरांचे नुकसान
अफगाणिस्तानमध्ये गेल्या 72 तासांमध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 74 जण जखमी झाले आहेत. आणि पुराच्या पाण्यामध्ये 41 जण बेपत्ता झाले आहेत. तर 250 जनावरांचाहीही मृत्यू झाला आहे, असे तालिबानच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रवक्ते शफीउल्ला रहीमी यांनी सांगितले.
या पावसामुळे 600 घरांचे नुकसान झाले असून हजारो एकर शेतजमिनीचेही नुकसान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मानवतावादी संघटनांकडून मदत स्वीकारण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनी तालिबानला केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये चित्राल जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत आणिबाणी
पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्वा प्रांतात गेल्या 48 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्वातमधील दोन, बट्टाग्राममधील दोन, मानसेरामधील चार आणि बुनेरमधील एकाचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे या प्रांतातील अप्पर आणि लोअर चित्राल जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत आणिबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे.
या जिल्ह्यात पुरामुळे अनेक पूल, रस्ते आणि जनावरे वाहून गेली आहेत. पाकिस्तानच्या अनेक भागात 26 जुलैपर्यंत अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे पाकिस्तानच्या हवामान विभागाने सांगितले.
चीनमध्ये पावसामुळे दिड हजार जणांचे स्थलांतर
चीनमध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण बेपत्ता झाले आहेत. आतापर्यंत 1500 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हॅन्गझाऊ प्रांतातील फुयांग जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वात जास्त तडाखा बसला आहे. या जिल्ह्यात एका डोंगराचा काही भाग अचानक खचला आणि जरडी कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.
त्यामुळे आतापर्यंत 1,500 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चोंगकिंगच्या नैऋत्येकडील भागात पुरामुळे किमान 15 जणांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसाने लिओनिंग या ईशान्येकडील प्रांतातील अनेक रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर केले, 5,590 लोकांना स्थलांतरित करावे लागले.