मुंबई – बाळासाहेब ठाकरे हिंदुह्रदयसम्राट होते. पण ते धर्मांध नव्हते. मला हिंदुंना जागे करायचे आहे पण त्यांचा खोमेनी व्हायचे नाही, असे बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते. बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदुंचे ओवेसी व्हायची घाई झाली आहे, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून मसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.
राज यांनी भोंगे आणि अन्य विषय उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा रंगवली जाते आहे. मात्र त्यांचे विरोधक विशेषत: शिवसेनेला हे रूचले नसून त्यांनी राज यांच्यावरच्या फैरी कायम ठेवल्या आहेत. आता मुखपत्रातूनही तोफ डागण्यात आली आहे.
देशातील जातीय आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेने राज ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र येऊन भाजपचा अजेंडा पुढे रेटीत आहेत. केंद्र सरकार मात्र हे मुकपणे पाहत आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचे हे लक्षण नाही, अशी अप्रत्यक्ष टीका देखील शिवसेनेने राज ठाकरेंवर केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीने आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांची तयारी म्हणजे देशातील राजकारण साफ बिघडवून टाकण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही या लेखात करण्यात आला आहे.