वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे आगामी काही दिवसात युक्रेनची राजधानी किव्ह येथे जाण्याची कोणतीही योजना नाही, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सोमवारी आपल्या माध्यम वार्तालापादरम्यान पुनरुच्चार केला.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी बायडेन यांनी युक्रेनमध्ये प्रत्यक्ष येऊन युद्धस्थिती आपल्या डोळ्यांनी पहावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे बायडेन युक्रेनमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली होती.
काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे युक्रेनमध्ये जाऊन आले आणि त्यांनी युद्धभूमीची प्रत्यक्ष पहाणीही केली होती. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅंचेझ यांनीही आगामी काही दिवसात किवहला जाण्याबाबत भाष्य केले आहे. युक्रेनमधील स्पेनचा दूतावास पुन्हा सुरू केला जाणार असल्याचेही ते म्हणाले होते.