#लोकसभा2019 : ‘पिंपरी-चिंचवड’ शहरातील नेत्यांचे ‘पॅचअप’ होईना; कार्यकर्ते सैरभैर

युतीतील परिस्थिती : भाजपाचे निष्ठावंत मनोमिलनापासून ठेवताहेत स्वत:ला दूर

पिंपरी – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तरी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना-भाजप युतीतील तणाव निवळण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी भाजप आमदारांसमोर “टाळी’साठी हात पुढे केला. मात्र, आमदारांनी हात आखडताच ठेवला आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणेतील भाजपचा सहभाग थंडावला आहे. केंद्रात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असताना स्थानिक नेत्यांची भूमिका ताठर असल्याने भाजप कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. विशेष बाब म्हणून पदांसाठी निष्ठावंत म्हणून पुढे येणारे “पॅचअप’मधून मात्र स्वत:ला दूरच ठेवत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रयत्न फसल्यानंतर आता मनोमिलनासाठी कोण पुढाकार घेणार हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले असतानाच शिवसेना भाजपामधील शहर पातळीवरील वाद सध्या विकोपाला पोहोचला आहे. शिवसेनेने हा वाद मिटावा यासाठी एक पाऊल मागे घेतले असले तरी भाजपा पदाधिकारी व आमदार लक्ष्मण जगताप हे आपल्या भूमिकेपासून हटायला तयार नाहीत. उमेदवार बदलण्याची भाजपाची मागणी शिवसेनेने फेटाळून लावत बारणे हेच उमेदवार राहतील हे स्पष्ट केले आहे.

आश्‍चर्याची बाब म्हणजे शहरातील निष्ठावंत म्हणवून घेणारे मात्र या प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. यामध्ये पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी हे सध्या सुरू असलेल्या त्रांगड्यापासून स्वत:ला लांब ठेवत असल्याने भाजपामध्ये नेमके काय चालले आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सर्वकाही अशी भूमिका संपूर्ण देशपातळीवर घेतली जात असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र त्याच्या उलट भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये हा कुतूहलाचा विषय बनला आहे.

बारणे-जगताप हा व्यक्तीगत वाद आता पक्षीय पातळीवर पोहोचला असून त्यामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भरडले जात असल्याने नाराजी व्यक्त होत. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे खासदार अमर साबळे यांची भूमिकाही अद्याप स्पष्ट झालेली नाही. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणारे अमर साबळे शहर पातळीवरील भांडणात समेट घडविण्यात पुढाकार घेत नसल्यानेही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आमदार महेश लांडगेंचा वेगळा मेळावा

आमदार महेश लांडगे यांनी मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी बुधवारी (दि. 3) मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा भोसरीतील संत ज्ञानेश्‍वर मंगल कार्यालयात सायंकाळी 6 ते 9 या वेळेत होणार आहे. मात्र मेळाव्याची जाहिरातबाजी करताना आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असा प्रचार चालविल्याने भोसरी भाजपा विधानसभा मतदारसंघात भाजपामध्येही दुही निर्माण झाली आहे. जर महेश लांडगे यांच्याच कार्यकर्त्यांचा मेळावा असेल आणि निष्ठावंत भाजपाला निमंत्रणच नसेल तर आम्ही जायचे कशाला? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही मेळाव्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.

राज्यपातळीवरील नेत्यांचे दुर्लक्ष

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या राज्यपातळीवरील भाजपा नेत्यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील युतीतील वादाकडे दूर्लक्ष आहे. या वादाकडे मुख्यमंत्री जाणिवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचाही आरोप आता होवू लागला आहे. मनोमिलनासाठी गिरीश बापट यांच्यानंतर कोणावरही जबाबदारी न दिल्यामुळे आश्‍चर्य आणि शंका उपस्थित होवू लागल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)