मुंबई – पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला असून त्यामुळे परत एकदा पाकिस्तानबरोबरच जागतिक क्रिकेट ढवळून निघणार आहे. तत्कालीन कर्णधार वसिम अक्रमवर त्यावेळी आरोप झाले होते. अक्रमने जर मला फिक्सिंगची ऑफर दिली असती तर माझ्या हातून त्याचा खून झाला असता असे धक्कादायक विधान शोएबने केले आहे.
1990 साली उघड झालेल्या या मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात अक्रमवर आरोप झाले होते. त्यावेळी त्याने अनेक खेळाडूंना ऑफर दिल्याचेही बोलले गेले होते. तसेच अक्रमसह सलीम मलिक, मोइन खान, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद, इजाज अहमद यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ड्रेसिंगरुममध्ये अक्रम माझ्याशी याबाबत कधीही बोलला नाही. मात्र, तो काहीतरी लपवत आहे असे मला वाटत होते. जेव्हा हे प्रकरण उघडकीला आले त्यावेळी मला धक्काच बसला. अक्रमने मला गोलंदाजीची जास्त संधीही दिली. त्याने मला सांभाळून घेतले. असा एक चांगला खेळाडू असे कृत्य करतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. एक मात्र खरे की जर त्यावेळी अक्रमने मला अशी ऑफर दिली असती तर माझ्याकडून त्याचा खून झाला असता, असे स्पष्टीकरण शोएबने दिले आहे.