कोल्हापूर : केंद्र सरकारने करोनाच्या साथीमुळे बंद केलेले काही व्यवसाय, उद्योग सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही हेही स्पष्ट केले आहे. मात्र अन्य व्यवसायाप्रमाणे दारू दुकानेही सुरु करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा शहरातील दारू दुकानदारांना होती. यासाठी सामाजिक अंतर पाळण्यासाठी काही दुकानदारांनी दुकानाबाहेर ऑइल पेंटने रस्त्यावर चौकोन आखले होते. मात्र केंद्र सरकारने दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी नाकारल्याने ही तयारी व्यर्थ ठरली आहे.
देशात करोनाचा प्रसार वाढू लागताच केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला. तसेच 3 मे पर्यत संचारबंदी लागू केली आणि सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद केले. त्यात देशी-विदेशी दारू दुकाने, परमिट रूम- बार यांचा समावेश आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर दारूची चोरटी विक्री सुरू आहे. तसेच सरकारच्या उत्पन्नाचा मोठा वाटा दारू निर्मिती व विक्रीतून मिळत असल्याने दारू दुकाने चालू करण्यास परवानगी दिली जावी, अशी मोहीम सुरू झाली होती. पण केंद्र सरकारने काल शुक्रवारी उशिरा देशभर दुकाने चालू करण्यास परवानगी दिली. मात्र दारू दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा खुलासा आज सकाळी करण्यात आला.
आजपासून अन्य व्यवसायाप्रमाणे दारू दुकानेही ही सुरू करण्यास परवानगी मिळेल अशी या व्यवसायातील लोकांची अपेक्षा होती. त्यासाठी सामाजिक अंतराची अट पाळणे बंधनकारक केले जाईल हे अपेक्षित होते. त्यादृष्टीने काही दारू दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर ऑइल पेंटने अंतराअंतरावर चौकट ही रंगवून घेतली होती. मात्र दारू दुकाने सुरु करण्यास केंद्र सरकारने नकार घंटा वाजवल्याने ही तयारी वाया गेली.