नवी दिल्ली – राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी यांची दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या जून महिन्यापासून हे पद रिक्त होते. आज राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या नियुक्तीला संमती दिली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले होते पण प्रत्यक्ष शपथ विधी होण्यास एप्रिल अखेर उजाडली आहे. त्यांच्या नियुक्तीला कॉंग्रेसने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ही निवड बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते.
ज्या व्यक्तीने या पदासाठी अर्जही केला नव्हता त्यांची या पदासाठी नियुक्ती करणे बेकायदेशीर आहे. या पदासाठी जी नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती त्यातही त्यांचे नाव नव्हते असा दावा कॉंग्रेसने केला आहे. कोठारी हे 1978 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते जून 2016 मध्ये निवृत्त झाले आहेत. 2017 पासून ते राष्ट्रपतींचे सचिव म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती चार वर्षांसाठी आहे.