वॉशिंग्टन – अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यात असलेल्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्क राज्याने दीपावलीच्या कालावधीत सुट्टी देण्याची घोषणा केली असून याबाबतचे विधेयक लवकरच अमेरिकेच्या संसदेतही पारित केले जाणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीप्रमाणे न्यूयॉर्कच्या स्टेट असेंबलीमध्ये याबाबतचे विधेयक मंजूर झाले असून ते गव्हर्नरकडे सहीसाठी गेले आहे. गव्हर्नर या विधेयकावर सही करतील यावर कोणालाही शंका नाही पण त्यानंतर अमेरिकेत संसदेत याबाबतचे विधेयक संमत करावे लागणार आहे जे यापूर्वीच मांडण्यात आले आहे.
अमेरिकन संसदेतही हे विधेयक मंजूर केले जाईल. या प्रकारच्या या निर्णयामुळे न्यूयॉर्क भागात राहणाऱ्या दोन लाख भारतीय कुटुंबियांना दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करता येणार आहे अशी माहिती मेयर एरिक डम्स यांनी दिली. गव्हर्नरने या विधेयकावर सही केली की न्यूयॉर्कमधील सर्व शाळांमध्ये हा नियम लागू होणार आहे. यावर्षी भारतीय कॅलेंडरप्रमाणे दिवाळी 12 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे याच वर्षीपासून दिवाळीची सुट्टीचा हा निर्णय लागू होऊ शकतो. असेंबलीमध्ये सदस्य जेनिफर राजकुमार यांनी हे विधेयक मांडले होते आणि त्यांनी हे विधेयक संमत व्हावे म्हणून मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता.
त्यापूर्वी 25 मे रोजी अमेरिकेच्या संसदगृहातही हे विधेयक मांडण्यात आले आहे. इतर काही राज्य सरकारांनीही नुकतीच दिवाळीची सुट्टी अधिकृत सुट्टी म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिकांसाठी दिवाळी हा सर्वात उत्साहाचा सण असला तरी गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये सुद्धा राष्ट्रपती दिवाळी साजरी करतात. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हापासून म्हणजे 2009 पासून अमेरिकन व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्यात येते. अमेरिकेत सध्या 44 लाखपेक्षा जास्त भारतीय राहत असून त्यांच्यासाठी हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा मानण्यात येतो.