लंडन – इस्त्रायलने १ एप्रिल रोजी सीरियात इराणच्या दुतावासावर अचानक हल्ला केला. ते असा हल्ला करतील अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. हल्ल्यात इराणचे वरिष्ठ अधिकारी मारले गेले. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून दोन दिवसांपूर्वी इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. वास्तविक इराणकडून असे पाउल उचलले जाऊ शकते असा इशारा अमेरिकेने अगोदरच दिला होता.
इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे इस्त्रायलने रोखली होती मात्र तरी त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस इराणने केले हा विषय राहतोच. त्यामुळेच इराणला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची तयारी इस्त्रायलने चालवली आहे.
त्यांनी रविवारी वॉर कॅबिनेटची बैठकही बोलावली होती. बैठकीत इस्त्रायलने प्रत्युत्तर द्यावे याबाबत सहमती झाली होती. मात्र हल्ला केंव्हा केला जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र इस्त्रायलचे समर्थन केल्याबद्दल त्या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री काट्ज यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री यांचे आभार मानले आहेत.
ब्रिटनने तर उघडपणे इस्त्रायलचे समर्थन केले आहे. आमचा देश इस्त्रायलच्या नागरिकांसोबत उभा असल्याचे प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केले आहे. तर दुसरीकडे आपले सहकारी राष्ट इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेनेही इस्त्रायलच्या शेजारी राष्ट्रांशी चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रत्येक चर्चेत अमेरिकेने एक बाब स्पष्ट केली आहे की अमेरिकेला युध्द आणि तणाव नको आहे. मात्र असे असले तरी इस्त्रायलला दिले जाणार समर्थन अमेरिकेकडून कायम राहील.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री काट्ज आणि इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन आमीर अब्दुल्लानह्यान यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी या घडामोडींबाबत चर्चा करतानाच तणाव कमी करण्याचे आवाहन केले.
भारत इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शत्रुत्वाबाबत विशेष चिंतीत आहे. या तणावामुळे विभागातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. सगळ्यांनी हिंसाचारापासून दूर राहावे आणि कुटनीतीचा वापर करावा असे भारताने म्हटले आहे.