पिंपरी – मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये (सीएमई) पुल बांधणी सरावावेळी झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून पिंपरी चिंचवड महापालिकेची 1 जानेवारीची नियोजित स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. नवीन वर्षातील पहिलीच सभा आठ दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आली. दिवंगताना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केला असल्याचा दावा सभापतींनी केला आहे. मात्र यानिमित्ताने वर्षाच्या पहिल्या दिवशी नियोजित केलेल्या स्थायीच्या तहकूब बैठकीने नव्या वर्षातही सभा तहकुबीचे ग्रहण लागले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी (दि. 01) पार पडली. विलास मडिगेरी अध्यक्षस्थानी होते. सभेच्या सुरूवातीलाच सभापतींनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सभा (दि. 8) पर्यंत लांबणीवर टाकली. दरम्यान अनेक विषयांमध्ये अर्थिक धागे-धोरे जोडायचे राहिल्यानेच सभा पुढे ढकल्याचा आरोप सर्वस्तरातून होऊ लागला आहे. सभा तहकूब केल्यानंतर सभापती विलास मडिगेरी यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या समोर जात गुलाबपुष्प देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र स्थायीची सभा तहकूब करून नवीन वर्षाची सुरुवातच सभा तहकूबीने केली.
दापोडीतील सीएमई येथे पूलबांधणी प्रात्याक्षिकावेळी झालेल्या अपघातात निधन झालेले जवान भिवा वाघमोडे, संजीवन पी. के. यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली असल्याचे सभापती विलास मडेगिरी यांनी सांगितले.