नवी दिल्ली – जागतिक क्रीडा क्षेत्रातील ऑस्कर अशी ओळख असलेल्या सर्वात प्रतिष्ठेच्या लॉरियस पुरस्कारासाठी भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला नामांकन देण्यात आले आहे.
जपानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या याच कामगिरीची दखल घेत त्याला लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हे नामांकन मिळवणारा नीरज तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना हे नामांकन मिळाले होते.
फोगटला प्रत्यक्ष पुरस्कार मिळाला नव्हता तर, हा पुरस्कार मिळवणारा सचिन पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. नीरजने ऑलिम्पिकमध्ये अंतिम स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी नेमबाज अभिनव बिंद्राने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
लॉरियसची प्रतिष्ठा
स्पोर्टस फॉर गुड फाउंडेशनच्या डेमलर आणि रिचमाउंट यांनी 1999 साली या पुरस्काराची सुरुवात केली होती. क्रीडा क्षेत्रकाच्या माध्यमातून अहिंसेचा प्रचार व्हावा, भेदभाव संपुष्टात यावा तसेच क्रीडा क्षेत्राकडे जग बदलण्याची ताकद आहे हे सिद्ध करणे हे या फाउंडेशनचे ध्येय होते. लॉरियस हा शब्द ग्रीक भाषेतील लॉरेल या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ ऍथलेटिक्स स्पर्धेतील विजयी चेहरा असा होते.