दुर्बोधतेचे कारण शोधणे म्हणजे ग्रेसला समजून घेणे : प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के

गुलमोहर ग्रुपने दिला ग्रेसच्या आठवणींना उजाळा

सातारा – कवी ग्रेस यांचे मराठी साहित्यातील योगदान मोठे आहेच. मात्र, त्यांची कविता दुर्बोध मानली जाते. या दुर्बोधतेमुळे रसास्वादात अडचणी येत असल्या, तरी ही दुर्बोधता दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ग्रेसला जाणून घेणे आहे. दुर्बोधतेचे अवडंबर न माजवता ग्रेसने असे का लिहिले असावे, याचा शोध घेत गेल्यास हा कवी अधिक सुबोध होऊ शकतो, असे प्रतिपादन विख्यात समीक्षक आणि डी. पी. भोसले कॉलेजचे प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के यांनी केले.

सातारा येथील गुलमोहर ग्रुपच्या वतीने, ग्रेसच्या जन्मदिनानिमित्त आयोजित, “ग्रेसफुल ग्रेस’ या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. किमान 21 वर्षे सुरु असलेल्या “गुलमोहर ग्रुप’तर्फे मागील किमान सहा वर्षे ग्रेसचा जन्मदिन साजरा केला जातो. मागील आणि यावर्षीही हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

डॉ. सोनटक्के पुढे म्हणाले की, ग्रेसच्या कवितेची जातकुळी निराळी असून, त्यांची कविता अनुवंशहीन आणि अनुकरण करता येण्याजोगी नाही. कवितेतील रुपक-प्रतिमांचा वेध हा ज्याला त्याला आपल्या आकलन पातळीनुसार घ्यायचा असला, तरी आस्वादक भूमिकेतून ग्रेसच्या निसर्गप्रतिमा आणि रंगभान हे विलोभनीय असेच आहे. मराठी साहित्यातील आपल्या योगदानाविषयी ग्रेस नेहमीच सजग, सावध आणि जबाबदारपूर्ण भावना ठेवणारे होते.

या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास वारुंजीकर यांनी केले. तर कार्यक्रमात सागर गायकवाड, हर्षल राजेशिर्के, मधुसूदन पतकी, चंद्रकांत कांबिरे, प्रा. विजयकुमार धुमाळ यांच्यासह असंख्य ग्रेसप्रेमी सहभागी झाले होते. तसेच दि. 10 मे रोजी झालेल्या दुसऱ्या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. कुलकर्णी यांनी केले. यामध्ये दीपक खांडके यांनी ग्रेसच्या कवितांचे गायन केले तर काही जणांनी ग्रेसच्या कविता सादर केल्या तर अनेकांनी ग्रेसच्या भेटींना उजाळा दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.