पुणे -व्यावसायिकाकडून ५८ गुंठे जमीन बळकावण्यासाठी त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे, तसेच मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. प्राथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांना हा आदेश दिला.
नितीन मनोहर हमने (वय ३१, कात्रज) असे या आरोपीचे नाव आहे. यातील आरोपी ॲड. दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार पेठेमधील ३३ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. ॲड. काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधली होती.
त्यानंतर काळे हिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता.खेड) येथील तीन कोटी रुपयांची ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करून दे नाहीतर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून, त्याला जेलमध्ये आयुष्यभर सडवेल, अशी धमकी दिली. यानंतर नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून ५८ गुंठे जमीन नावावर करून द्या नाहीतर तुझ्या नवऱ्याला आम्ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हमने याने केलेल्या जामिनाच्या अर्जास सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींनी या गुन्ह्यात बंदुकीचा वापर केला आहे, या सर्वांचा तपास सुरू आहे, त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बेंडभर केला.