राष्ट्रवादी अन्‌ शिवसैनिकांचे मुंबईतील घडामोडींकडे लक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक घडामोडी या राज्यातील सत्तास्थापनेवर अवलंबून असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांचे मुंबईतील हालचालींकडे लक्ष लागले आहे. शहरात राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत परतायचे आहे. तर शिवसेनेलाही आपली जागा पक्की करावयाची असल्याने राज्यात कोणाचे सरकार येणार हे राजकीय क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरावर राष्ट्रवादीने अनेक वर्षे एकहाती सत्ता राखली होती. तर शिवसेनाही शहरातील क्रमांक दोनचा पक्ष राहिला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपाची राज्यात ताकद वाढल्यानंतर त्याचे पडसाद शहरातही उमटले. भाजपाच्या फोडाफोडाची राजकारणात राष्ट्रवादी सत्तेतून हद्दपार झाली. तर शिवसेनेचही ताकद घटली. शहरात क्रमांक एकचा पक्ष म्हणून सध्या भाजपा आहे. राज्यातील सत्तेपाठोपाठ महापालिकेतही या पक्षाने सत्तास्थापना केली होती.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार शहरात निवडून आले असले तरी जनाधार घटल्याचे पहिल्यांदाच स्पष्ट झाले. त्यातच राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तशीच परिस्थिती शिवसेनेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महापालिकेवर सत्ता मिळविणे सोपे जाणार आहे. गेल्या वीस दिवसांपासून सत्तेचा सारिपाट मुंबईत रंगला असला तरी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय क्षेत्राच बारिक लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. लवकरात लवकर महाशिव आघाडीचे सरकार अस्तित्त्वात यावे अशी या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

सेनेत अस्वस्थता अन्‌ भाजपात आनंद
राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर शहर पातळीवरील शिवसेनेत काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपेतर सरकार स्थापन न होता राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आनंद भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.