इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल-अझिझिया प्रकरणात देखील निर्दोष ठरवले आहे. हा त्यांना मिळालेला आणखीन एक दिलासा आहे.
नवाझ शरीफ यांना एकूण दोन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यातील एक प्रकरण अल-अझिझिया हे आहे. याच वर्षी इस्लामाबाद उच्च न्यायालयानेच शरीफ यांना अव्हेनफिल्ड गैरव्यवहार प्रकरणात देखील निर्दोष ठरवले होते.
२४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांना अल-अझिझिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय, त्यांना १.५ अब्ज पाकिस्तानी रुपये आणि २५ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.
सौदी अरेबियातील अल-अझिझिया स्टील मिल आणि हिल मेटल एस्टॅब्लिशमेंट कंपनी सुरू करण्यासाठीचा निधी कोठून मिळवला, हे शरीफ स्पष्ट करू न शकल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. मात्र दरम्यान शरीफ लंडनला निघून गेल्यावर २०२० मध्ये त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.
ऑक्टोबर महिन्यात लंडनमधून परत आल्यानंतर शरीफ यांनी या दोन्ही प्रकणांमध्ये आपल्याला दोषी ठरवण्याच्या निकालाला आव्हान देणारे अर्ज न्यायालयात दाखल केले होते. हे अर्ज फेटाळण्यात यावेत अशी राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोने केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली होती.