पेशावर – पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुन्वा प्रांतात एका पालीस ठाण्यावर करण्यात आलेल्या काही आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये किमान २३ पोलीस कर्मचारी ठार झाले. पाकिस्तान तालिबानशी संबंधित दहशतवादी गटाने हे आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणले आहे.
दक्षिण वझिरीस्तान या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सीमेवरच्या दारा इस्माईल खान जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर लगेच आणखीन एक आत्मघातकी स्फोट घडवून आणला गेला. त्यामध्ये पोलीस ठाण्याची इमारत कोसळली.
त्यानंतर ६ दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार करत केलेल्या हल्ल्यात किमान २३ सैनिक मारले गेले, असे इंटर सर्व्हिसेस इंटिलीजन्स पब्लिक रिलेशन या लष्कराच्या माध्यम विषयक शाखेने सांगितले.
सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्त्तरादाखल केलेल्या गोळीबारात सर्व ६ दहशतवादी मारले गेले. घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवून देण्यात आली आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.
काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक रुग्णालयांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. तर शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
पाकिस्तान तालिबानशी संबंधित संघटनेचा हल्ला…
तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी संबंधित तेहरिक ए जिहाद पाकिस्तान या नव्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने अलिकडच्या काळात मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी लाहोरपासून ३०० किलोमीटर अंतरावर मालिवाल येथील हवाई दलाच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता.
त्यावेळी विमानांचे नुकसान झाले होते. जुलै महिन्यात बलुचिस्तान प्रांतातील झोब गॅरिसन येथेही हल्ला केला गेला होता. गेल्या वर्षभरापासून तालिबानशी संबंधित दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.