मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ई-मेलवरुन मुंबईवर हल्ला करण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.आलेल्या ई-मेलमध्ये तालिबानचे नाव घेत धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचेही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांना एनआयएने याची माहिती दिली असून सर्वत्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आयडीवर हा मेल आला आहे. मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
धमकीच्या मेलची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस आणि इतर तपास यंत्रणा याचा तपास करत आहे. मेल कोणी पाठवला? नेमका मेल कुठून आला आहे, याचा शोध तपास यंत्रणा करत आहेत. मुंबईसह देशातील इतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क मजबूत आहे. अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला 10 मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.