नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. नुकतेच ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका देखील झाली होती. त्यातच आता बाबा रामदेव यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. इस्लामचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना उचलून नेऊ शकता अथवा अन्य काहीही करू शकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
राजस्थानमधील बाडरमेर जिल्ह्यातील पनोणिया येथे धर्मपुरी महाराज मंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदेव बाबा यांनी हिंदू आणि ख्रिश्चन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी रामदेव बाबा यांनी,“इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. इस्लाम धर्मात ५ वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून न्या अथवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा.”असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ख्रिश्चन धर्माबद्दल बोलताना बाबा रामदेव यांनी, “चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असं होत नाही. असं कुराण आणि बायबलमध्ये लिहलं नाही, मात्र असं सांगितलं जातं.” असे म्हटले.
“पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,” असे बाबा रामदेव यांनी सांगितले.