मुंबई – हडपसर, मांजरी आणि पिंपरी-चिंचवड उपनगरांतील काही भागांत कोयता गॅंग ने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. हे गुन्हेगार रात्री-अपरात्री कोयता दाखवून चोरी, वाहनांची तोडफोड, लुटमार करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ मोक्का लावा, तडिपार करा, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. सध्या शहर आणि इतर परिसरात कोयता गॅंगने प्रचंड धुडगूस घातला असून, सामान्य पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गॅंगमधील काही गुंडांच्या पोलिसांनी देखील मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कारवाही केल्यास पोलिसांना बक्षी देण्यात येणार आहे. “कोयता गॅंगला पकडा, बक्षीस मिळवा..’, अशी मोहीम सध्या पुणे पोलिसांनी राबवली असल्याचं दिसून आलं आहे. अश्यातच, आता पोलिसांनी आणखी एक नवीन नियम लागू केला आहे. यापुढे पोलिसांकडून कोयता विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड घेऊन तो कशासाठी घेत आहे, याची माहिती ठेवण्याचे बंधन विक्रेत्यांवर घातले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात कोयता पडू नये, म्हणून पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी नवी शक्कल लढविली आहे. कोयते विकणाऱ्यांना कोणताही परवाना लागत नाही. मात्र, कोण आणि कशासाठी कोयते विकत घेतो, याची नोंद विक्रेत्यांना करायला सांगण्यात आले आहे. कोयता विकत घेणाऱ्यांचे आधार कार्ड घेऊन तो कशासाठी घेत आहे, याची माहिती ठेवण्याचे बंधन विक्रेत्यांवर घालण्यात आले आहे.