Nathan Lyon Record : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे झाला, ज्यामध्ये कठीण खेळपट्टीवर प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियन संघाने 383 धावांची मोठी धावसंख्या उभारली. दरम्यान, नॅथन लायनने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला पहिल्या डावात 179 धावांत रोखण्यात यश मिळविले. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 164 धावांवर रोखले असले तरी त्यांनी किवी फलंदाजांसमोर 368 धावांचे मोठे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ चौथ्या डावात केवळ 196 धावा करू शकला आणि 172 धावांनी सामना गमावला.
A comprehensive victory for the Aussies in Wellington!
Nathan Lyon finishes with match figures of 10-108 #NZvAUS pic.twitter.com/0obsbQ46l9
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2024
दुसऱ्या डावातही नॅथन लायनने शानदार गोलंदाजी करत 6 बळी घेतले. आता WTC मध्ये त्याच्या नावावर एक ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत या चॅम्पियनशिपची अंतिम फेरी दोनदा खेळली गेली आहे. आतापर्यंत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याचा विक्रम भारताच्या रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता, ज्याने 9 वेळा एकाच डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेऊन, नॅथन लायनने सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याच्या बाबतीत अश्विनला मागे टाकले आहे कारण त्याच्या नावावर आता दहावेळा 5 विकेट्स घेण्याची नोंद झाली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियन ऑफ-स्पिन गोलंदाज नॅथन लायनच्या नावावर आहे, ज्याने हा पराक्रम तीनदा केला आहे.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत नॅथन लायनने दिग्गजांना टाकले मागे….
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत, नॅथन लायनने वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज कोर्टनी वॉल्शला मागे टाकले आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 519 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी नॅथन लायनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 517 विकेट्स होत्या, मात्र आता ही संख्या 527 झाली आहे. त्याने 128 कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे. आता नॅथन लायनचे पुढील लक्ष्य ग्लेन मॅकग्रा असेल. मॅकग्राच्या नावे कसोटी कारकिर्दीत 563 बळी आहेत.