नागपूर – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात काल नागपूर येथे गुप्त बैठक झाली आहे. आजी-माजी गृहमंत्र्यांच्या या भेटीमूळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. ऩागपूर येथील शासकीय निवासस्थानी काल ते होते. या बैठकी दरम्यान परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विदर्भ दौऱ्यावर असून काल नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट घेतली. ही भेट नागपूर येथील शासकिय निवास्थान असलेल्या रवी भनव येथे झाली. या दोन नेत्यांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचे बघायला मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
माजी गृहमंत्री यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई शहरातून १०० कोटी वसुली करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपाच्या प्रकरणाचा सीबीआयने तपास केल्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने सुद्दा याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला होता.