शिरूर, – लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यकच असते, असं नाही. सत्ता नसतानाही काम करता येतं. फक्त आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी हा जागरुक असावा लागतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुरमध्ये पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली.
या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदार अशोक पवार, रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजाताभाभी पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.
सत्तेत असल्याशिवाय विकास कामांसाठी निधी मिळत नाही, म्हणून सत्ता आवश्यक असते, अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने सांगितलं जातं असताना. शरद पवारांनी जाहीर सभेत आज अजित पवारांचे हे विधान खोडून काढले.
पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दोन खासदार आहेत. ज्यांचं नाव देशातील लोकसभेत घेतलं जात. त्यातली एक माझी मुलगी सुप्रिया सुळे आणि दुसरे डॉ. अमोल कोल्हे. आज काही लोक सांगतात लोकसभेत जायचं. पण नुसतं जाऊन काय उपयोग,निधी आणावा लागतो, त्यासाठी सत्ता असावी लागते.
आज मला विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या तीन ठिकाणी जाऊन 56 वर्षे झाली. हिंदुस्थानच्या लोकसभेत असा एकही माणूस नाही तो या ना त्या सभागृहात सलग 56 वर्षे आहे. चांगल काम करणारा जागरूक सभासद असेल तर निधी मिळतो ती जागरूकता डॉ. कोल्हे यांच्यामध्ये आहे.
पवार पुढे म्हणाले की, नुसत शेती एके शेती करून चालणार नाही. रांजणगावला जी जमीन आहे ती जिरायत असताना मला अस्वस्थ करायची. नंतर तिथे येऊन बैठक घेतली एमआयडीसी केली. स्थानिक लोकांनी सहकार्य केल्यानंतर काय होतं. याच उत्तम उदाहरण शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे. अनेक कामे होऊ शकली ती तुमच्या सहकार्यामुळे पाठींब्यामुळे, असेही पवार म्हणाले.
…तर अशोक पवारांना संधी
सरकार मध्ये या तालुक्याला कमी संधी दिली असं म्हटलं जातं. हे खरंय गेली अनेक वर्षे आंबेगावला वळसे पाटलांना मंत्रीपद गेलं, शिरूरला कमी संधी मिळाली. हे मी मान्य करतो. पण आता एक गोष्ट चांगली झाली चार पैकी तीन जणांनी रस्ता बदलला. आता शिरूरला मंत्रीपदाची संधी मिळेल. अशोक पवारांच काम चांगलं त्यांना संधी मिळेल, असे सांगत शरद पवारांची अशोक पवारांबाबत मोठी घोषणा या सभेत केली.
म्हणून बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव अडकला
बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे भावूक झाले. तेे म्हणाले, नम्रपणे दादांना आव्हान करु इच्छितो, जुन्नर तालुक्यात जाताय, तर चिमुकल्याचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेलाय.
त्या लेकराच्या माऊलीला भेटा. काही दिवसांपूर्वी तुम्ही इथं आला होता, तेव्हा टिंगलीच्या स्वरूपात म्हणाला होता, नसबंदी झाली की सरकार गडगडतं. आता आठ वर्षांच्या लेकराच्या आईच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही हेच बोलणार आहात का? मी बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासंदर्भात वन अधिकार्यांना भेटलो होतो, त्यांनी आदेश दिले; पण एक मुख्यमंत्री, दोन दोन उपमुख्यमंत्री तिकीट वाटपात बिझी असल्याने जुन्नर वन विभागाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही.