मोदींच्या सभेकडे नगरकरांचे लक्ष

सभेसाठी कडक सुरक्षाव्यवस्था; मुख्यमंत्री उपस्थित राहणार

दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

मोदींसाठी यंदा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्‍त पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षक, पाच अप्पर पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 35 पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे 200 अधिकारी, कर्मचारी असा तब्बल एकूण दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन आहे. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह अतिरिक्त फौजफाटा, बॉम्बशोधक पथकांना शहरात पाचारण करण्यात आले आहे. विशेष सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, स्पेशल कमांडो बंदोबस्ताला राहणार असल्याचे समजते.

नगर – नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सावेडी येथील संत निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार असून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळी साडेनऊ वाजता ही सभा होणार आहे. त्यामुळे पहाटेपासून सावेडी भागाकडे येणारे अनेक रस्ते बंद करण्यात येणार आहे. मोदी सभास्थानी मोटारगाडीने येणार आहे. सकाळी दिल्लीहून विमानाने ते शिर्डीत येणार असून तेथून हेलिकॉप्टरने नगरच्या लष्कराच्या हद्दीतील हेलिपॅडवर उतरणार आहे. तेथून मोटारगाडीने मोदी सभास्थानी येणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार आहे. तेही मोटारगाडीने सभास्थानी येणार आहे. अनेक रस्त्यावर नो एन्ट्री सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजनासाठी व पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला आहे. सभास्थळाचे परिसरातील अनेक रस्त्यांवर वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आले आहेत. तर काही रस्त्यांवरील वाहतूक इतर रस्त्याने वगळण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा बदल करण्यात आला आहे.

अशी असेल वाहतूक व्यवस्था :

पारिजात कॉर्नर चौकातून बीएसएनल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आनंद विद्यालयाच्या बाजूच्या रस्त्यावरुन संत निरंकारी भवनाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नुपूर इस्टेट एजन्सीपासून संत निरंकारी भवनाकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. रेणुका माता मंदीरापासून जॉगींग ट्रॅककडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

न्यू सिंध कॉर्नर पासून जॉगींग ट्रॅककडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. गंगा उद्यानकडून संत निरंकारी भवन मैदानाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना श्रीकृष्ण मंदिरापासून एलआयसी कॉलनीमार्गे प्रोफेसर कॉलनीकडे वळविण्यात येणार आहे. तारकपूर रोडवरुन संत निरंकारी भवनाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना वसंतकीर्ती, मिस्कीन मळा मार्गे प्रोफेसर चौक रोडकडे वळविण्यात येणार आहे. गंगा उद्यान पासून संत निरंकारी भवन मैदानाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. गंगा उद्यान पासून पंकज कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरील सर्व वाहने इतर मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.