नगर – राज्यांमध्ये माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील शेतपिकांच्या नुकसान पोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 135 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहेत.त्याचे वाटप बहुतांश झाले असून आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतिक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील जवळपास 110 कोटीेचे अनुदान वाटप पूर्ण झालेले असून उर्वरीत या आठवड्यात पूर्ण होईल.
हे अनुदान सांख्यिकी क्रमानुसार गावनिहाय केले जात आहे. सदर तहसीलदारांनी ते संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिलले आहेत. राज्यामध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारणत तीन लाख 71 हजार हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. प्रशासनाने तसेच तलाठी व महसूल यंत्रणेने तसेच कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले होते.
नगर जिल्ह्यामध्ये साधारणत 475 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.शासनाने मदतीचे निकष बदलल्याने 475 ऐवजी 449 कोटी मदत जिल्ह्याला मिळणार आहे. नगर जिल्ह्यासाठी 135 कोटी रुपयांच्या अनुदान येथील प्रशासनास प्राप्त झाले आहे . सदर अनुदान हे शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार वाटप केले जात आहे.