“तरुण थट्टा सहन करणार नाहीत’

पाथर्डी – लोणी कारखान्यावर बैलगाडी मागे घेण्याच्या किरकोळ कारणावरून पाथर्डीतील ऊसतोडणी कामगारांना विखेंकडून चाबकाने मारहाण करून, पोलीस ठाण्यात डांबले होते. विखेंची दादागिरी कळाल्यावर आम्ही तेथे गेलो व ऊसतोड कामगारांना विखेंशी भांडून सोडवून आणले. एकीकडे लोणीकरांनी केलेला अन्याय व दुसरीकडे पंतप्रधान रोजगार मिळविण्यासाठी तरुणांना भजे तळून पैसे कमविण्याचा सल्ला देऊन त्यांना अपमानीत करीत आहेत. त्यामुळे लोणीकरांची दादागिरी व भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा युवक सहन करणार नाही, अशी टीका केदारेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी केली.

दरम्यान, ढाकणे यांच्या या आरोपाचा धागा पकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी येत्या 23 तारखेला होत असलेल्या निवडणुकीच्यावेळी लोणीकरांची दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी त्यांना घरी पाठवा, असे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाथर्डी तालुक्‍यातील तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी येथील ग्रामस्थांशी आ. जगताप व ढाकणे यांनी संवाद साधून गाठीभेटी घेतल्या. यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, पं. स. सदस्य किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अंबादास राऊत, दिलीप पवळे, संजय चोपडा, राजेंद्र दौंड आदी उपस्थित होते.

गावांमधील छावण्यांना आ. जगताप यांनी भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणवून घेतल्या. आ. जगताप म्हणाले, काही दिवसांपूर्वी आमचे विरोधक भाषणात लोकांना म्हणाले, मला फोन करण्याच्या भानडीत पडू नका. माझ्यामागे कारखाने, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, असा मोठा व्याप आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा व्याप सांभाळू द्या. मी तुमच्या समस्या सोडविण्यासाठी 24 तास हजर आहे. भाजप पाच वर्षांपासून दिलेली आश्‍वासने ते पूर्णतः विसरुन गेले आहेत. यांची देशात पुन्हा सत्ता आल्यास हे लोकं राज्यघटनेत बदल करुन तुमच्या आमच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे सत्ता परिवर्तन घडवा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.