श्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’

समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत कॉंग्रेसच्या तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांनी भाजपचे “कमळ’ हातात घेतले. परिणामी येथील कॉंग्रेस “पोरकी’ झाली. तालुकाध्यक्ष देखील दुसऱ्या पक्षात गेल्याने घाईने तालुकाध्यक्ष नेमून वाताहत झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पक्षात कार्यकर्तेच राहिले नाहीत.

एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या श्रीगोंदा तालुक्‍यातील कॉंग्रेस गेल्या पाच वर्षांत आणि विशेषतः या विधानसभा निवडणुकीनंतर अगदीच अस्तित्वहीन झाली आहे.
स्वातंत्र्योनंतर काळात लाल निशाण पक्षाचे (कम्युनिस्ट पार्टी) तालुक्‍यात प्राबल्य होते. मात्र 70 च्या दशकात स्व. शिवाजीराव नागवडे, शिवरामअण्णा पाचपुते यांनी प्रमुख सहकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लाल निशाण पक्षाचे वर्चस्व असलेला हा तालुका कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला. कॉंग्रेस हा त्यावेळी तालुक्‍यातील एकमेव प्रमुख राजकीय पक्ष होता.

बाबुराव भारस्कर हे सलग तीन वेळा येथून विधानसभेत गेले. मतदारसंघ खुला झाल्यानंतर स्व. शिवाजीराव नागवडे यांनी कॉंग्रेसकडून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. तत्कालिन कॉंग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी 1979 साली श्रीगोंद्याला भेट दिली होती. त्यामुळे अवघा तालुका कॉंग्रेसमय बनला होता. डाव्या विचारसरणीला येथून नेहमीच झुकते माप मिळाले. तालुक्‍यातील साखर कारखाना, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती या संस्थांवरही कॉंग्रेसचे एकतर्फी वर्चस्व होते.

1995 साली बबनराव पाचपुते हे ही कॉंग्रेसच्याच तिकीटावर विधानसभेत गेले होते.
तालुक्‍यात कॉंग्रेसकडे जुन्या पिढीतील अनेक मातब्बर नेते होते. अपवाद वगळता तालुक्‍यातील प्रमुख नेते कॉंग्रेसच्या मुशीतच तयार झाले. त्यामुळे तालुक्‍यातील सर्व सत्तास्थाने कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पुढे कॉंग्रेसला गटबाजीचे “ग्रहण’ लागले अन्‌ येथील कॉंग्रेस कमकुवत होण्याचे “बीजारोपण’ झाले. माजीमंत्री बबनराव पाचपुते हे एक अपवाद वगळता सतत कॉंग्रेस विरोधातच राहीले.

अंतर्गत वादातुन पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या “फंदफितुरी’ प्रवृत्तींमुळे कॉंग्रेसला उतरती कळा लागली होती. तरीही नगर दक्षिणेतील कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशीच तालुक्‍याची ओळख होती. तालुक्‍यात पाच वर्षांपूर्वी स्व.शिवाजीराव नागवडे, स्व.कुंडलिकराव जगताप, अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, हेमंत ओगले हे कॉंग्रेसचे प्रमुख नेते होते.

यातील अनेकांना कॉंग्रेसकडून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे विविध पदं मिळाली. मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य राहुल जगताप यांनी कॉंग्रेसला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्व.शिवाजीराव नागवडे आणि स्व. कुंडलिकराव जगताप यांचे निधन झाले. अण्णासाहेब शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे यांनी कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली राहण्याऐवजी दरवेळी परिस्थितीनुरूप सोयीची भूमिका घेतली.

परिणामी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, हेमंत ओगले हेच कॉंग्रेसमध्ये राहिले होते. त्यातही आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नागवडेंनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपचे “कमळ’ हाती घेतले. यामुळे कॉंग्रेसला तालुक्‍यात मोठा झटका बसला. नागवडे यांच्याबरोबर पक्षातील कार्यकर्त्यांचा संपूर्ण संचच गेल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेस अस्तित्वहीन झाली आहे.

विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून नागवडेंची ओळख पण थोरातांना देखील नागवडे यांना थांबिवता आले नाही. थोरातांचे विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विखेंनी भाजपमध्ये केल्यानंतर बहुतांशी तालुक्‍यातील कॉंग्रेस संपवून टाकली.

गेल्या पाच वर्षांत केंद्रातील आणि राज्यातील गेलेली सत्ता आणि स्थानिक नेत्यांची राजकारणातील बदलती भूमिका यामुळे दक्षिणेच्या बालेकिल्ल्यातच अस्तित्वहीन झालेल्या कॉंग्रेसला तालुक्‍यात गतवैभव प्राप्त करण्यासाठी यापुढे प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. येथील सामान्यजन आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दल ममत्वभाव असला तरी त्यांना भक्कम आधार अन्‌ पक्षाला “संजीवनी’ देणाऱ्या नेतृत्वाची आता गरज आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे दिसत असल्याने कॉंग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांची पुन्हा “घरवापसी’ होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

गटबाजीने कॉंग्रेस शक्तिहीन
कॉंग्रेसनेही येथील नेत्यांना नेहमीच “ताकद’ दिली होती. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांचे स्व.शिवाजीराव नागवडेंवर विशेष प्रेम होते. त्यामुळेच मोठमोठी प्रलोभने जुगारून स्व. नागवडेंनी “पुलोद’ सरकारच्या प्रयोगावेळी कॉंग्रेसची व वसंतदादांचीच पाठराखण केली होती. माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर यांचीही नेहमीच श्रीगोंद्यातील कॉंग्रेसवर “मेहरनजर’ राहीली. पण जिल्ह्यातील व तालुक्‍यातील गटबाजीने कॉंग्रेस शक्तीहीन करण्याचे काम केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.