पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील थोरांच्या स्मारकांना गुरुवारी भेटी देऊन अभिवादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग कार्यालय आणि माजी खासदार स्व. गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरांजली अर्पण केली.
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, अजय भोसले, आरपीआय चे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, अॅड मंदार जोशी, शिवसंग्रामचे भरत लगड,
लहुजी क्रांती सेनेचे विष्णू कसबे, लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश भाजप उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
राज्यात २०१४ ते २०१९ मधील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुण्यासाठी अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार पुण्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.
महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता असताना विकासाची कामे केली आहेत. त्या दृष्टीने आम्ही पुणेकरांकडे कौल मागणार आहोत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे ठरवले आहे, त्यासाठी पुणेकरांचे एक मत महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी याप्रसंगी दिली.