जामखेड, (प्रतिनिधी) – तालुक्यातील रत्नदीप मेडिकल अँड फार्मसी रिसर्च सेंटर या कॉलेजचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला डॉक्टर मोरे याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिगवण येथून उसाच्या शेतातून अटक केली.
रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात होते. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींचा देखील शारीरिक छळ येथे केला जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांनी गेल्या आठ दिवसापासून आंदोलनाचा हत्यार उपसल होते.
तसेच शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील गेल्या आठ दिवसांपासून डॉ. भास्कर मोरेवर कारवाईसाठी उपोषणास बसले आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करताच नाशिक, पुणे तसेच रायगड येथील विद्यापीठाच्या समितीने रत्नदीप मेडिकल कॉलेजला भेट दिली होती.
यावेळी समितीला कॉलेजमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर समितीने कॉलेजच्या सहा प्रयोगशाळांना देखील सील केले होते. मात्र, जोपर्यंत कॉलेजची मान्यता रद्द होत नाही व डॉक्टर भास्कर मोरे याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन व उपोषण सुरूच राहणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या अंदोलनास आ. रोहित पवार, आ. राम शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस विवेकानंद वाखारे, तसेच विविध विद्यापीठांच्या समिती यांनी भेटी दिल्या. तसेच विविध पक्ष संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचा रोष बघता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक पुणे, इंदापूर आणि यवत या भागामध्ये आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता अखेर डॉ. भास्कर मोरे हा इंदापूर येथील भिगवन या ठिकाणी असलेल्या एका उसाच्या शेतामध्ये आढळून आला असून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.