पिंपरी – विधानसभा निवडणुका, दिवाळीनंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आठवडाभराच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसे आदेश राज्य शासनाकडून आले आहेत.
महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2019 पर्यंत रजा मिळण्यासाठी राज्य शासनाकडे अर्ज केले होता. त्यांना रजा घेण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जागी पिंपरी महापालिका आयुक्तपदाचा पदभार पीएमआरडीएचा कारभार सांभाळणाऱ्या विक्रम कुमार यांच्याकडे सोपविण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव सुभाष इंगळे यांनी दिले आहेत.
दरम्यान, निवडणुका, दिवाळीत महापालिका कामकाज ठप्प राहिले. त्यात आता आयुक्त हर्डीकर रजेवर गेले आहेत. तर, विक्रम कुमार यांच्याकडे अतिरिक्त पदभार असला तरी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर पडण्याचीच अधिक शक्यता आहे.