पुणे, दि. 7 -“रात्रसेवेत असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि अन्य स्टाफने नेमून दिलेल्या रुग्णालयात उपस्थित असायलाच हवे,’ या नियमांवर बोट ठेवत पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी पुण्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला “सरप्राइज व्हिजिट’ दिली. तसेच आढावा घेतला. याला ते “सरप्राइज व्हिजिट’ म्हणत असले, तरी हे नियोजन आधीच “लीक’ झाल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
राज्याचे आरोग्य आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतला आणि त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यांनी “सरप्राइज व्हिजिट’ने कामाला सुरूवात केली. त्यांनी स्वत: वैराग, बार्शी येथे “सरप्राइज व्हिजिट. केली. अन्य अधिकाऱ्यांनाही त्यांनी आदेश दिले.
रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी आपल्या नियोजित वेळी उपस्थित असणे बंधनकारकच आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन मुंडे यांनी सर्व जिल्ह्याच्या आरोग्य संचालकांना याबाबत आदेश दिले. त्यानुसार आळंदी ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी भेट दिली. त्यावेळी तेथे सर्व स्टाफ उपस्थित असल्याचे दिसून आले. याशिवाय 10 महिला आणि 5 पुरुष रुग्ण दाखल होते.
रुग्णालयात स्वच्छता असल्याचेही आढळले. याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनीही वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
हे असायलाच हवे…
डॉक्टर, परिचारिका, स्टाफने नियोजनानुसार कामावर असणे बंधनकारक
डॉक्टरांनी ऍप्रन आणि अन्य स्टाफने त्यांचा गणवेश घालणे बंधनकारक.
रुग्णालयात स्वच्छता असावी, येणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
…अन् अधिकाऱ्यांनीच गुगल लोकेशन पाठवले
मुंढे यांची एवढी धास्ती अधिकाऱ्यांनी घेतली की, व्हिजिट केलेल्याचे ठिकाण, वेळ कळावे यासाठी त्याचे गुगल लोकेशन टाकून त्यांनी छायाचित्रे काढली. मात्र अधिकारी व्हिजिटला येणार आहेत हे आधीच “लीक’ झाल्याने या व्हिजिटने “स्टाफ’ला “सरप्राइज’ मिळाले असे म्हणता येणार नाही. मात्र, अशी व्हिजिट खरेच झाली तर निलंबनाची कारवाई मोठ्या प्रमाणात होणार हे नक्की, असे बोलले जात आहे.