प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे आणि उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे यांच्यातर्फे हे निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या.
मुख्यमंत्री शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे बार कार्यकारिणी व बहुसंख्य वकील सदस्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यामध्ये “मुंबई उच्च न्यायालयात दाव्यांची संख्या ही राज्यात सर्वाधिक असून, त्याचा लवकर निपटारा व्हावा आणि सर्वसामान्य जनतेला लवकर न्याय मिळावा,’ म्हणून मागणी करण्यात आली.
राज्याचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि शिवसेनेचे (शिंदेगट) जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. “असोसिएशनकडून करण्यात आलेल्या मागणीचा सरकार योग्य विचार करेल. पुण्यावर अन्याय होणार नाही,’ असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
यावेळी उपाध्यक्ष ऍड. विवेक भरगुडे, ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सेक्रेटरी अमोल शितोळे, ऍड. सुरेखा भोसले, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासनीस शिल्पा कदम, कार्यकारिणी सदस्य ऍड. काजल कवडे, ऍड. सई देशमुख, ऍड. अर्चिता जोशी, ऍड. मजहर मुजावर, ऍड. अमोल भोरडे, ऍड. अजय नवले, ऍड. अमोल दुरकर, ऍड. तेजस दंडागव्हाळ, ऍड. कुणाल अहिर, ऍड. रितेश पाटील यासह वकील बांधव उपस्थित होते.
पुणे खंडपीठ स्थापन प्रकरणरात पुणे बार असोसिएशनतर्फे लवकरच कृती समितीचे गठन करण्यात येत आहे. सदर कृती समितीच्या गठनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर कृती समितीद्वारे खंडपीठाच्या मागणीचा पाठपुरवठा करण्यात येणार आहे.
– पांडुरंग थोरवे,
अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन