MP Election : एबीपी न्यूज आणि सी व्होटरने मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये यावेळी जनतेला मुख्यमंत्रीपदावर कोणाला पाहायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने एका सर्वेक्षणाद्वारे मध्य प्रदेशातील जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिली पसंती कोणाला आहे? या प्रश्नाचे उत्तर या सर्वेतील आकडेवारीतून लक्षात येते.
एबीपी न्यूज सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, 43 टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदासाठी आपली पहिली पसंती म्हणून घोषित केले आहे. याशिवाय 42 टक्के लोक कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छितात.
याशिवाय या सर्वेक्षणात दहा टक्के लोकांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती असल्याचे घोषित केले आहे.
तर केवळ दोन टक्के लोकांनी दिग्विजय सिंह यांना आपली पसंती म्हणून घोषित केले आहे. तीन टक्के लोक असे आहेत की, ज्यांना या चार नेत्यांपैकी एकही मुख्यमंत्री म्हणून आवडत नाही.