Mission Gaganyaan : इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशन (ISRO) 21 ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण पाठवणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली. चाचणी वाहन विकास उड्डाण (TV-D1) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गगनयान मोहिमेची माहिती देताना जितेंद्र सिंह यांनी, ‘या चाचणीमध्ये क्रू मॉड्युलला बाह्य अवकाशात प्रक्षेपित करणे, ते पृथ्वीवर परत आणणे आणि बंगालच्या उपसागरात टचडाउन केल्यानंतर ते पुनर्प्राप्त करणे समाविष्ट आहे. क्रू मॉड्यूल गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणार असल्याचे म्हटले.
दरम्यान, नौदलाने क्रू मॉड्यूल पुनर्प्राप्त करण्यासाठी मॉक ऑपरेशन सुरू केले आहे. क्रू मॉड्यूल व्यतिरिक्त, TV-D1 क्रू एस्केप सिस्टमची देखील चाचणी करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान कोणतीही समस्या उद्भवल्यास रॉकेटमधील अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितपणे कसे पोहोचू शकतील याची चाचणी केली जाईल आहे.
गगनयान मिशन अंतर्गत, इस्रोने पुढील वर्षाच्या सुरुवातीला गगनयान मिशनच्या पहिल्या मानवरहित मिशनची योजना आखली आहे. मानवरहित मोहिमेमध्ये कोणताही मानव अंतराळात पाठवला जाणार नाही. मानवरहित मोहिमेच्या यशानंतर एक मानवयुक्त मिशन असेल ज्यामध्ये मानव अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.
यापूर्वी, इस्रोने चंदीगडमध्ये 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान गगनयान मोहिमेसाठी ड्रॅग पॅराशूटची यशस्वी चाचणी केली होती. हे पॅराशूट अंतराळवीरांच्या सुरक्षित लँडिंगसाठी मदत करेल. यामुळे क्रू मॉड्युलचा वेग कमी होईल, तसेच तो स्थिर राहील. त्यासाठी चाचणीदरम्यान अंतराळवीरांच्या लँडिंगसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.