नवी दिल्ली – आयकर विभागाकडून कॉंग्रेस पक्षाला आलेल्या नोटीशींमुळे अगोदरच पक्षाच्या अडचणी वाढल्या असताना आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथही विभागाच्या रडारवर आले आहेत. कमलनाथ यांच्या माध्यमातूनच एका कंपनीचे पैसे कॉंग्रेस पक्षाला गेल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
आयकर विभागाचा असा तर्क आहे की २०१३ ते २०१९ या काळात कॉंग्रेसला ६२६ कोटी कॅश मिळाली आहे. २०१९ मध्ये विभागाने यासंदर्भात अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यात दोन कंपन्यांची पावती त्यांना मिळाली. यातील एका कंपनीचे नाव मेघा इंजिनिअरिंग आहे तर दुसरी कंपनी कमलनाथ यांच्याशी संबंधित आहे.
कमलनाथ यांच्याशी संबंध असलेल्या कंपनीकडून कॉंग्रेसला जो पैसा मिळाला आहे तो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणखी एक खळबळजनक दावा केला गेला की मध्य प्रदेशातील मोठ्या अधिकाऱ्यांकडून लाच घेतली गेली आणि काही मंत्रीही यात सामिल आहेत.
ही जी पैशाची देवाणघेवाण झाली त्याची सांगड दर्शवणारे बरेच पुरावे आमच्याकडे असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. एका इंग्रजी माध्यमाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार कमलनाथ यांच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयात थेट २० कोटी रूपये गेल्याची माहितीही आयकर विभागाकडे उपलब्ध आहे.
कायद्याचा हवाला देत आयकर विभागाचे म्हणणे आहे की कलम १३ ए अंतर्गत कोणताही राजकीय पक्ष २ हजार रूपयापेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात घेऊ शकत नाही. मात्र कॉंग्रेसच्या प्रकरणात या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले.
दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या विरोधातील कारवाईला आव्हान दिले आहे. हे लोकशाहीचे वस्त्रहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र कमलनाथ यांच्या माध्यमातून पक्षाला एवढी रक्कम रोख स्वरूपात मिळाली असल्याची माहिती जर खरी असेल तर कमलनाथही अडचणीत येऊ शकतात.