नवी दिल्ली – येत्या 17 ऑक्टोबरपासून देशात आणखी दोन खासगी कॉर्पोरेट रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. या टप्प्यात लखनौ-दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या मार्गावर या गाड्या धावणार आहेत.
तथापि या गाड्यांमध्येही करोनाचे निर्बंध पाळले जाणार असून एका सीट शेजारी दुसरे सीट मोकळे ठेवण्याचे बंधन याही गाड्यांना घालण्यात आले आहे. यातील प्रवाशांना कोविड संरक्षण किट दिले जाणार आहे, त्यात सॅनिटायझरची बाटली, मास्क, फेस शिल्ड आणि हातमोजांची जोडी अशी सामग्री दिली जाणार आहे.
प्रवाशांच्या सामानांचे कसोशीने निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सर्व प्रवाशांना मास्क व फेस शिल्ड घालणे सक्तीचे करण्यात आले असून या गाडीतील प्रवाशांनी केंद्र सरकारचे आरोग्य सेतू ऍप आपल्या मोबाइलवर डाऊन लोड करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
तेजस एक्स्प्रेस अशी या खासगी गाड्यांची नावे आहेत. येत्या 17 ऑक्टोबरपासूनच इंदौर ते वाराणसीदरम्यान काशी महाकाल तेजस एक्स्प्रेस ही आणखी एक खासगी रेल्वे गाडी सुरू होणार होती. पण ती मात्र त्या दिवशी धावणार नाही.
17 ऑक्टोबरला वरील दोन खासगी तेजस गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वेने दीडशे खासगी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील या दोन गाड्या आहेत. आयआरसीटीसीमार्फत ही कार्पोरेट रेल्वे सेवा सुरू होत आहे.
या आधी 4 ऑक्टोबरपासून दिल्ली-लखनौ आणि 19 जानेवारीपासून अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद या गाड्या सुरू झाल्या आहेत.