MLA Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रेचा निकालाचा अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा निकाल देणे बंधनकारक होते. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहे. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र 10 जानेवारीला नार्वेकर आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार अपात्रताप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विधिमंडळ सचिवालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून कागदपत्रंही दाखल करण्यात आली आहेत. एकमेकांविरोधात केलेले आरोप प्रत्यारोप खोडण्याची संधी दोन्ही गटांना सुनावणी दरम्यान मिळणार आहे.