“मिसिंग लिंक’मुळे एक्‍स्प्रेस वेवरील प्रवास जलद होणार

अपूर्ण मार्गिकेचे काम सुरू : प्रवास करणाऱ्यांसाठी ठरणार वरदान

लोणावळा – पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेच्या उभारणी पासून आजपर्यंत एक्‍स्प्रेस हायवे आणि त्याच्या दर्जावर सातत्याने प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खंडाळा बोर घाटात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताचे सत्र. त्यामुळे यावर उपाय म्हणून राज्य सरकारकडून एक्‍स्प्रेस वेच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आणि या कामात प्रामुख्याने एक्‍सप्रेस वेच्या सुरुवातीच्या उभारणीच्या काळात सिंहगड कॉलेज ते खालापुरातील आडोशी या दरम्यान अपूर्ण राहिलेली मार्गिका म्हणजेच “मिसिंग लिंक’ तयार करण्याच्या कामाचा समावेश आहे.

“मिसिंग लिंक’ या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेतील सर्वात कठीण, घाटमार्गाचा आणि अपघाताचा असा टप्पा सोपा होणार आहे. याशिवाय या “मिसिंग लिंक’मुळे पुणे-मुंबई या दरम्यान खंडाळा, बोर घाटातील अवघड टप्पा कमी होतानाच एकूण अंतर 6 किलोमीटरने कमी होऊन प्रवासातील 20 ते 25 मिनिटे इतका वेळ वाचण्यासाठी मदत होणार आहे. या “मिसिंग लिंक’मध्ये आडोशी ते सिंहगड कॉलेजपर्यंत आठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दोन मोठे बोगदे पाडून भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. याशिवाय आडोशी व गारमाळ या भागात दोन महाकाय केबल स्टेड पूल उभारले जाणार आहेत. सुमारे साडेसात हजार करोड रुपये खर्चाचे हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प “एमएसआरडीसी’ने केला आहे.

या प्रकल्पातील पहिल्या पुलाची सुरुवात खालापूर टोलनाक्‍यापासून पुढे असलेल्या आडोशी येथील खोपोली एक्‍झिटपासून होणार आहे. खोपोली एक्‍झिटपासून सुरू झालेला हा पूल दोन्ही बाजूच्या मिळून एकूण आठ मार्गिका असणारा 770 मीटर लांब आणि तब्बल 30 मीटर उंचीचा असणार आहे. या पहिल्या पुलानंतर सुरु होणार पहिला बोगदा 1 किलोमीटर 60 मीटर आणि दुसरा बोगदा असेल 1 किलोमीटर 120 मीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पातील दुसरा पूल हा सर्वात खडतर टप्पा असणार आहे. अत्यंत खोल दरीवर हा पूल उभारला जाणार आहे. हा देशातला अशा पद्धतीचा पहिलाच पूल असणार आहे. या केबल स्टेड पुलाची लांबी ही 645 मीटर, तर उंची तब्बल 135 मीटर असणार आहे.

प्रकल्पातील दुसरा बोगदा नागफणीच्या कड्याच्या खालून खोदला जाणार असून, सिंहगड संकुलसमोर बाहेर पडणार आहे. विशेष म्हणजे लोणावळा तलावाच्या 75 मीटर ते 175 मीटर इतके खाली या बोगद्याचे काम करण्यात येणार आहे. या बोगद्याची एकूण लांबी तब्बल 8.9 किलोमीटर असणार आहे. तसेच या बोगद्याच्या सुरक्षेसाठी बोगद्यामध्ये प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर आपत्कालीन बायपास ठेवण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.