पुणे – कोथरूड येथील एकलव्य कॉलेज ते पुणे -बंगळुरू महामार्गापर्यंतचा अर्धवट रस्ता लवकरच सुरू होणार आहे. महापालिका विकास आराखड्यात असलेला हा १५ मीटर रूंदीचा रस्ता असून शेवटच्या टप्प्यात अवघा १०० मीटरचा रस्ता ताब्यात नसल्याने या भागातील नागरिकांना महामार्गावर जाण्यासाठी महात्मा सोसायटी अथवा कुंबरे पार्कच्या बाजूने पौड रस्त्यावर येऊन चांदणी चौकाकडे जावे लागत होते.
मात्र, या रस्त्यामुळे नागरिकांंना अवघ्या पाच मिनिटांत महामार्गाच्या सेवा रस्त्यावर जाता येणार आहे. महापालिकेस “मिसिंग लिंक’अंतर्गत या रस्त्याची जागा ताब्यात मिळाली आहे. पुढील दोन दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरद्ध पावसकर यांनी दिली.
कोथरूड तसेच कर्वे पुतळ्याकडून वारजे तसेच चांदणी चौकाकडे जाण्यासाठी वाहनांना महात्मा सोसायटी अथवा पौड रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यातच, महात्मा सोसायटीचा रस्ता लहान असल्याने तर पौड रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्याने महापालिकेकडून काही वर्षांपूर्वी आशीष गार्डनपासून पुढे एकलव्य महाविद्यापर्यंत डीपी रस्ता विकसित करण्यात आला होता. तर, एकलव्य महाविद्यालयासमोरून महामार्गाकडे जाण्यासाठी आणखी ४०० मीटरचा प्रस्तावित होता. त्यात महामार्गाकडून सुमारे ३०० मीटर रस्त्याचे काम झालेले आहे.
तर, शेवटच्या टप्प्यातील १०० मीटरचा रस्ता जागा ताब्यात नसल्याने बंद होता. त्यामुळे महापालिकेकडून “मिसिंग लिंक’ प्रकल्पाअंतर्गत हा रस्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर जागा मालकांनी महापालिकेस सोमवारी जागा ताब्यात दिल्या असून, पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पौड रस्ता तसेच महात्मा सोसायटीला वळसा घालून जवळपास दोन किलोमीटर अंतर तसेच २५ ते ३० मिनिटे करावा लागणारा प्रवास आता अवघ्या पाच मिनिटांत होणार आहे.