पुणे – हडपसर परिसरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या बाजूच्या लोकवस्तीतून रेल्वे रूळालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. काही बेजबाबदार नागरिकांच्या वागणुकीमुळे रेल्वे मार्ग अस्वच्छ होत असून यातून दुर्घटना घडत आहेत. रेल्वे मार्गावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसचे मार्गाच्या बाजूला अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. रेल्वेकडून देखील या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या रेल्वेला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी पुणे शहर व परिसरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. त्यावेळी पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील घोरपडी ते सासवड दरम्यान विशेषत: हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गालगत घरगुती स्वरूपाचा कचरा टाकला जात असल्याचे आढळले.
कचऱ्यात असल्याने प्राणी, गुरे येतात. यातून रेल्वेला धडकून रेल्वे रूळावरून घसरण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच, या मार्गावरून तेल, कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्यांबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना आग लागून मोठा धोका होऊ शकतो. या प्रकारानंतर रेल्वेच्या व्यवस्थापकांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून यामध्ये लक्ष देण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रेल्वे मार्गावर कचरा टाकू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सर्वाधिक कचरा आढळलेली ठिकाणे…
महंमद वाडी रेल्वे गेट क्र. ७ जवळ, ससाणे नगर, रामटेकडी, ससाणे नगर फॉर्च्युन प्लाझा आणि वर्धमान टाऊनशिप सोसायटी, सय्यद नगर.