पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उन्हाळी सुट्टयांमध्ये बाहेरगावी फिरायला जाताय आणि तेही ट्रेनने जात असाल तर थांबा… अधी तिकिट उपलब्ध आहे का याची पाहणी करा. कारण, उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे पुढील दोन महिन्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
उन्हाळी सुट्टयांमध्ये रेल्वेचा मोठी गर्दी असते. काही नागरिक शाळा व कार्यालयांच्या सुट्ट्या जुळून आल्यानंतरच नियोजन करतात. तर नागरिकांकडून दक्षिणेतील व उत्तरेतील ठिकाणांना सुट्ट्यांच्या काळात पर्यटनासाठी प्राधान्य दिले जाते. त्यासाठी रेल्वेचे तिकीट १२० दिवस आधीपासून आरक्षित करण्यात येते.
त्यामुळे अनेकांनी आधीपासूनच तिकीट बुक करण्यास सुरूवात केली आहे. आता जे प्रवासी बाहेरगावी अथवा आपल्या मूळ गावी रेल्वेने जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य रेल्वेकडून ट्रेनला वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्याचे व फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले जाते.
गोव्याला जाणाऱ्या रेल्वे फुल्ल्ल
पुणे रेल्वे स्थानकावरून गोव्यासाठी दोन एक्स्प्रेस धावतात. या गाड्यांसह इतर रेल्वेचे १५ मेपर्यंत गोव्याला जाण्याचे बुकिंग फुल्ल्ल झाले आहे. त्याबरोबरच जम्मू-काश्मीर, सुरत मार्गांवर रेल्वेचे बुकिंग फुल्ल्ल आहे. तसेच, झेलम, चेन्नई एक्स्प्रेस, हावडा, मदुराई एक्स्प्रेस गाड्यांचे पुढील दोन ते अडीच महिन्यांचे बुकिंग फुल्ल्ल झाले आहे.