पुणे – संतांच्या पालखी सोहळा आगमनानंतर लक्ष्मी रस्त्यासह जंगली महाराज रस्ता, पाटील ईस्टेट परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आले. परिसर स्वच्छता हीच ईश्वरसेवा अशी अनुभूती या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून दिसून येत होती.
पालखी काळात शहर स्वच्छतेसाठी पालिकेने दरवर्षीप्रमाणे नियोजन तर केलेच होते, शिवाय अतिरिक्त मनुष्यबळही तैनात केले होते. पालख्यांच्या आगमनाला यंदा थोडा उशीरच झाला होता. तरीही, पालिकेचे स्वच्छता कर्मचारी रात्री उशिरापर्यंत रस्त्यांचे झाडणकाम करताना दिसून आले. प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावर व्यापारी पेठ असल्याने दुसऱ्या दिवशी व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी हे कर्मचारी घेत होते.