मालेगाव – इंजिनिअरिंग रेजिमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद सचिन मोरे यांच्यावर मूळगावी साकुरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. करोना महामारीची छाया असतानाही भावपूर्ण निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी गावकऱ्यांनी “भारतमाता की जय’ अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन वीरपुत्रांला अखेरचा निरोप दिला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शहीद जवान सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने प्रारंभी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले, हिमालयाच्या कुशीत ज्या ठिकाणी पाणी व रक्त गोठून जाते अशा ठिकाणी भारतमातेच्या संरक्षणासाठी आमचे जवान सदैव कार्यरत आहेत. आज युद्धजन्य परिस्थिती उभी ठाकली असताना आमचे नवजवान चिनी गनिमाला ठणकावून सांगताहेत, “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या’ अशा भावना उराशी बाळगून आपले सैनिक आज देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत, अशा सर्व सैनिकांना त्यांनी अभिवादन केले.