अबाऊट टर्न : मिथ्यसंसार

-हिमांशू

आजकाल बनावट गोष्टी इतक्‍या वाढत चालल्यात, की काही दिवसांनी अस्सल गोष्टी भिंगातून शोधाव्या लागतील. खऱ्या गोष्टी जर मूठभरच उरल्या, तर त्यांची अवस्था “लांडगा आला रे आला’सारखी होऊन बसेल. अस्सल गोष्टींकडेही संशयानं पाहिलं जाईल आणि ती नजर पाहून “बनावटच बरं’ असं वाटू लागेल. जातीपातीच्या दाखल्यांपासून पासपोर्टपर्यंत अनेक गोष्टी डुप्लिकेट बनवून देणारे महाभाग आहेत, हे आपल्याला बातम्यांमधून समजतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदार ओळखपत्रं तर काही ठिकाणी शेकड्यांच्या संख्येनं उकिरड्यावर सापडल्याच्या घटना घडल्या आहेत आणि बऱ्याच वेळा ही कार्डं बनावट असल्याचं समोर आलंय. पॅन कार्ड, रेशन कार्डपासून स्टॅंपपेपरपर्यंत असंख्य बनावट वस्तू आपल्यासमोर येऊन गेल्यात.

दुकानदाराला आपण दिलेली नोट जेव्हा तो नीट न्याहाळून बघतो, तेव्हा आपल्याच पोटात विनाकारण गोळा येतो. ही नोट आपण एटीएममधून काढलेली की कुणी आपल्याला दिलेली? डुप्लिकेट निघाली तर दुसरी नोट आपल्याकडे आहे का? ती तरी खरी असेल का? आपल्याकडे डुप्लिकेट नोट सापडली म्हणून आपल्यावर तर कारवाई होत नाही ना? असे असंख्य प्रश्‍न मनात येऊन जातात आणि तोपर्यंत दुकानदार ती नोट गल्ल्यात टाकतो, तेव्हा कुठं आपला जीव भांड्यात पडतो. अहो, हल्ली तर एखादी धक्कादायक बातमी ऐकली-पाहिली तरी वाटतं, “कौन फिरकी ले रहा है!’

तात्पर्य, असली-नकलीमधलं अंतर कमी होत चाललंय आणि अस्सल गोष्टीच खोट्या वाटू लागतील ही भीती वाढलीय. अशात जर एखाद्यानं खोटं-खोटं लग्न केल्याचं कळलं तर धक्का बसणारच! कारण “किराए का शौहर’ आपण फक्त बॉलिवूडपटांमधून पाहिलाय. लग्न केल्यावरच हिरॉइनला कौटुंबिक मालमत्ता मिळणार असते म्हणून ती डुप्लिकेट नवरा करते, हे फक्त चित्रपटात घडू शकतं. पण फिल्लमवालेही प्रेक्षकांच्या भावना फार काळ दुखावत नाहीत.

कालांतरानं हिरॉइन डुप्लिकेट नवऱ्याच्या प्रेमात पडते आणि खरं लग्न करते. पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात तब्बल 28 महिलांनी खोटे विवाह केल्याचं अचानक उघड झालं, तेव्हा हसावं की रडावं कळेना! थायलंडमध्ये ही घटना उघडकीला आलीय आणि अटक केलेल्या 28 जणींमध्ये एक भारतीय महिलाही आहे. त्याहून धक्‍कादायक बातमी म्हणजे, अटक केलेल्यांमधली एक महिला चक्क सत्तर वर्षांची आहे. हा सगळा खटाटोप भारतीय लोकांना थायलंडमध्ये निवासी व्हिसा मिळावा यासाठी झाल्याची माहिती समजली.

या प्रकरणातला दलाल आधी गजाआड झाला आणि मग त्याचे कारनामे समोर आले. हा पठ्ठ्या थायलंडमधल्या महिलांना पैसे देऊन खोटं लग्न करायला लावत असे आणि लग्नाच्या कागदोपत्री पुराव्यावरून पतीला थायलंडमध्ये निवासी व्हिसा मिळत असे. या महिलांनी ज्या पुरुषांशी लग्न केलं, त्या पुरुषांसोबत त्या कधीही राहिल्या नाहीत. भातुकलीच्या खेळातले राजा-राणीसुद्धा डाव मोडल्यानंतर विलग होतात.

इथं तर डाव मांडलाच गेला नाही. अशा प्रकारे बनावट लग्नं होताहेत, याची माहिती इमिग्रेशन विभागाला मिळाल्यावर सखोल चौकशी झाली आणि कुणीच आपल्या जोडीदारासोबत राहात नसल्याचं निष्पन्न झाल्यावर अटकसत्र सुरू झालं. “संसार’ मिथ्य आहे हे खरं; पण खोट्याच्या दुनियेत रुचिपालट म्हणून किमान एखादी गोष्ट खरी ठेवाल की नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)