पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केलेल्या पोलिसाचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश एस.पी पोंक्षे यांनी फेटाळला. गणेश शिवाजी चिमटे ( वय ३३) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या पोलिसाचे नाव आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गणेश चिमटे याच्यासह त्याचे आई-वडील आणि अन्य एकावर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षणसह विविध कलमांनी गुन्हा दाखल आहे.
पीडित मुलगी ही १६ वर्षांची आहे, हे माहिती असूनही त्याच्या आई-वडिलांनी तिच्याशी त्याचे लग्न लावून दिले. त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून तिने अपत्य जन्माला घातले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्याने केलेल्या अटकपूर्व जामिनास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपी हा पोलीस खात्यात असूनही त्याने गुन्हा केलेला आहे. तो कर्तव्यावर विनापरवानगी गैरहजर आहे. खात्याअंतर्गत चौकशीलाही सामोरे जाण्यास टाळाटाळ करीत आहे.
तसेच पीडिता ही आरोपीची पत्नी असून आरोपीने पीडितेशी गुपचूपणे बालविवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने बाळाला जन्म दिला. तिथे आरोपीचे नाव पिता म्हणून नमूद असल्याचा युक्तिवाद ऍड. अगरवाल यांनी केला.