पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये महापालिकेकडून दररोज १२०० टॅंकरच्या फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, हे टॅंकर मोफत असताना पाणी घेऊन गेल्यानंंतर संबंधित टॅंकर चालक अथवा मदतनीस नागारिकांना पैसे मागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
ही बाब गंभीर असल्याने महापालिका प्रशासनाने नागरीकांनी अशा प्रकारे पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन पुणेकरांना केले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक तसेच तक्रार क्रमांकही महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
महापालिकेमधील नवीन समाविष्ट गावांमध्ये तसेच जुन्या हद्दीतील ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे त्या ठिकाणी पुणे पालिकेमार्फत टँकर दिले जातात. सदर टँकर पूर्णपणे मोफत दिले जातात. ११ गावांसाठी दररोज ३०० फेऱ्या तर २३ गावांसाठी ८०० फेऱ्या होत आहेत.
तर महापालिकेकडून ही पाण्याची मागणी वाढत असल्याने टॅंकर फेऱ्यांची संख्या आणखी वाढविली जाणार आहे. त्यामुळे पैसे मागण्याच्या वाढत असलेल्या तक्रारी तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हे हेल्पलाइन क्रमांक़ सुरू करण्यात आलेले आहेत.
तक्रार करण्यासाठी…
टँकर चालक किंवा त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने पैसे मागितल्यास संबंधित व्यक्तीचे नाव, तक्रारदाराचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह पुणे महापालिकेचा टोल फ्री क्रमांक १८००१०३०२२२ क्रमांक़ावर कळवावे, तसेच ८८८८२५१००१ या मोबाइल क्रमांकावर व्हॅटसअप द्वारेही नागरिक तक्रार करू शकतील त्या सोबतच PMC CARE App डाउनलोड करुन त्यावर फोटो आणि पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.