पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात श्री रामजी संस्थान तुळशीबागच्यावतीने दि. ९ ते २७ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा,
श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, कीर्तन सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले यांनी दिली.
पत्रकार परिषदेला संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६३ वे वर्ष साजरे होत आहे.
तुळशीबागेत मंगळवारपासून उत्सवाला सुरूवात होणार आहे, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच नवोदित आणि दिग्गज कलाकार गायनसेवाही करणार आहेत. दि. १० एप्रिलला पं.शौनक अभिषेकी यांचे गायन, १३ एप्रिलला गौरी पाठारे यांचा सांगीतिक कार्यक्रम आणि दि. १५ एप्रिलला गायक श्रीधर फडके यांचा गीतरामायण कार्यक्रम होणार असल्याचे राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले यांनी सांगितले.