नगर – कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कामकाज सुरळित व नियमाप्रमाणे चालवायचे असेल तर त्या संस्थेने उपविधींचा सखोल अभ्यास करणे गरजेचा असतो. प्रभाग क्र.2 मधील लक्ष्मीनगर गृहनिर्माण संस्था ही खूप जुनी असून या संस्थेचे काम शासनाने मंजूर केलेल्या कायद्यामधील बदलाप्रमाणे सुरु असल्याने, या संस्थेचा कारभार जिल्ह्यात आदर्शवत ठरत आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सावेडी उपनगरात सर्वात प्रथम लक्ष्मीनगर गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन होऊन संस्था व सहकार विभाग यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत सभासदांच्या हिताचा विचार होत, असल्याने जिल्ह्यात आदर्शवत कार्य असणाऱ्या संस्थेवर नूतन अध्यक्ष एकनाथ खिलारी व उपाध्यक्ष नवनाथ दळवी यांच्या नियुक्तीबद्दल प्रभाग क्र.2 च्या नगरसेवकांकडून आ.जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, तन्वीर मनियार, सचिन गाडे, संस्थेचे सचिव भानुदास दातीर, ज्येष्ठ संचालक सूर्यकांत झेंडे, राजेंद्र शेटे, संजय कांडेकर, गजानन जाधव, उत्तम काळे आदी उपस्थित होते.
यावेळी त्र्यंबके म्हणाले, हा भाग आमच्या प्रभागात येत आहे. येथील प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांसह संस्था पाठपुरावा करीत असल्याने कामे मार्गी लागतात, असे सांगितले. तर निखिल वारे यावेळी म्हणाले, ही संस्था खूप जुनी आहे. या संस्थेला ओपन स्पेस इतका मोठा आहे की, आम्ही आ.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चारही नगरसेवकांनी मॉर्निंग ट्रॅकचा प्रश्न सोडविला याचे समाधान होत आहे.