पोलीस आयुक्तांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना : कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः छेडछाडीसह महिलांबाबतच्या इतर गुन्ह्यासंदर्भात खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांनी कटाक्षाने कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली आहे.
आयुक्तालयात गुरूवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बैठकीत त्यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. शहरातंर्गत आणि बाहेरुन बदलून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दुवा साधण्यासाठी ही बैठक झाली. बैठकीत पोलीस आयुक्तांनी झोननुसार कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या टोळ्या, गॅंगवॉर, महिला छेडछाड, सोनसाखळी चोरी विषयांवर चर्चा करण्यात आली.
हद्दीतील गॅंगवॉर्सची माहिती काढून कारवाई करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचित करण्यात आले आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हद्दीतील छोट्या मोठ्या घटनांवर कारवाईचा बडगा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काही दिवसांपासून शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करुन चेन स्नॅचिंग केले जात आहे. यासाठी पथकांनी दक्ष राहून कारवाई करण्यासाठी स्पष्ट शब्दात सूचित करण्यात आले. विशेषतः सायंकाळच्या वेळेत पथकांनी विशेष लक्ष दिल्यास घडणाऱ्या घटनांना आळा बसणार असल्याची चर्चा करण्यात आली. विनामास्क भटकंती करणाऱ्यांविरुद्धही कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
झोननुसार कारवाईचा मास्टरप्लॅन…
नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रत्येक झोननुसार मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनी हद्दीतील गुन्हेगारीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.