पुणे – भविष्यातील करोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आयसीयू, व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध करण्यासाठी सर्व रुग्णालयांनी युद्धपातळीवर काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी केले.
राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत उपाययोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. खासगी रुग्णालयांनी करोना बाधिताच्या उपचारांअंती देण्यात येणाऱ्या अवाजवी वैद्यकीय देयकावर नियंत्रण आणावे, रुग्णालयातील उपलब्ध खाटा गरजू रुग्णांना देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा. सहव्याधी रुग्णांवर प्राधान्याने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना राव यांनी दिल्या आहेत.
तर, जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत करोनाच्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 27 हजार इतकी गृहीत धरण्यात आली आहे. यातील 24 हजार रुग्ण हे कोविड केअर सेंटरमध्ये असणार आहे. तर तीन हजार रुग्णांना रुग्णालयात उपचाराची गरज भासू शकते, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात 800 बेड नव्याने उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये 600 आयसीयू आणि 200 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश असणार आहे. या सुविधा सुरू करण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत करण्यासाठी एजन्सी पुढे येतील. 15 ते 20 दिवसांत या एजन्सीने हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. दि. 20 ऑगस्टपासून हे हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार आहे.
– सौरभ राव, विशेष कार्यकारी अधिकारी.