मकरंद पाटलांसमोर मदन भोसलेंचे कडवे आव्हान

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक केली प्रतिष्ठेची

एकंदर ही निवडणूक पारंपरिक असली तरी दादांसाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वाची तर आबांसाठी वर्चस्व सिद्ध करण्यासाठीची आहे. दोघेही उमेदवार तुल्यबळ आहेत. एकीकडे मोदी-शहाचा करिष्मा आणि दुसरीकडे शरद पवारांचा झंझावात यामुळे मतदार आबा की दादांना पसंती देणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

वाई – उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात नऊ उमेदवार उरले आहेत खरे. मात्र मुख्य लढत ही मकरंद पाटील आणि मदन भोसले यांच्यातच होणार आहे. विशेष म्हणजे मदन भोसले यांना ही निवडणूक सोपी व्हावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत बंडखोर पुरुषोत्तम जाधवांना माघार घ्यायला लावल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे बोलले जात आहे.

मदन भोसले आणि मकरंद पाटील यांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करुन जाहीर सभा घेत एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतल्याने मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वाई मतदारसंघ पहिल्यापासून शिवसेनाला सोडलेला असल्याने अखेरपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी टोकाचे आग्रही होते. उमेदवारी आपल्याच मिळाणार या अपेक्षेने पुरुषोत्तम जाधव यांनी गेली वर्षभर मतदारसंघात भिरकीट लावले होते.

जाधव यांनी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली आहे. पाहिल्यावेळी तीस हजारांचा तर दुसऱ्या वेळी पंचवीस हजार मतांचा टप्पा गाठला होता. जाधव यांनी स्वतःच्या मतांचे पॉकेट तयार करून ठेवले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे जाधव यांचे यावेळीही आमदार होण्याचं स्वप्न भंगले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाधवांना कोणता शब्द दिला असेल? याची चर्चा रंगू लागली आहे. जाधव यांची बंडखोरी यावेळी महायुतीचे उमेदवार मदन भोसले यांना अडचणी आणणारी होती. त्यांच्या माघारीने भोसले यांचा मार्ग थोडा सोपा झाला आहे.

सलग दोन वेळा मंकरद पाटील आमदार आहेत. ते एकदा अपक्ष तर एकदा राष्ट्रवादीतून विजयी झाले आहेत. मतदारसंघात केलेली कोट्यवधींची विकासकामे आणि जनसंपर्क या मुख्यत्वे दोन मुद्द्यांवर ते निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत. तळागाळापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी हे त्यांचे आणखी एक मोठे बलस्थान आहे. त्याचा फायदा त्यांना दोन्ही निवडणुकीत झाल्याचे दिसून आले आहे. मात्र आता राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी विशेषतः खंडाळा तालुक्‍यातील भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे मकरंद पाटील यांची बलस्थाने कमकुवत झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

मात्र संघटनात्मक कामात ते माहीर असल्याने त्यांनी दुसरी समांतर कार्यकर्त्यांची फळी कामाला लावल्याचे दिसते. ही फळी कशापद्धतीने काम करते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. तर भाजपवासी झालेले मदन भोसले यांची ही चौथी निवडणूक आहे. 2004 मध्ये पहिल्यादा अपक्ष निवडून आले होते. तत्पूर्वी ते माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यानंतर ते 2009 व 2014 मध्ये पराभूत झाले होते.

किसनवीर कारखान्यात त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केल्याने त्यांची मतदारसंघावरील पकड आपसूक सैल पडली अन्‌ कार्यकर्त्यांची फळी कोलमडून पडली. दादांचा संपर्क तुटला. परिणामी त्यांना दोन्ही वेळेला अपयश पत्करावे लागले. परवाच्या आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी हितासाठी राजकीय किंमत मोजावी लागल्याचे सांगितले. गतवेळीच दादांनी भाजपमधून निवडणूक लढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता, पण जेष्ठ नेत्यांनी विरोध केल्याने ते पुन्हा कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले.

आता ही निवडणूक मदन भोसले भाजपमधून लढत आहेत. मोदी लाटेने देशाचं चित्र बदलल आहे. महाराष्ट्रात ही त्याचा परिणाम लोकसभेत दिसला तसा तो पुन्हा दिसेल असे अंदाज बांधले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर मदन भोसले यांना याठिकाणी उमेदवारी भाजपकडून दिली गेली आहे. दादांचे संस्थात्मक काम मोठे आहे. शिवाय 65 हजार मतांचा गठ्ठा ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवाय सात महिन्यात मुख्यमंत्र्यांकडून दादांनी कोट्यवधीची कामे मंजूर करून आणल्याने मतदारांसमोर जाताना तो मुद्दा त्याच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.